न्हावरे: न्हावरे (ता.शिरूर) येथे बुधवारी (दि.२७) करोनाचे दोन रुग्ण सापडल्यामुळे पुढील चौदा दिवसांसाठी न्हावरे गाव आणि परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी ‘दैनिक प्रभात’शी बोलताना माहिती दिली.
मेडीकल्स वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे पुढील चौदा दिवस न्हावरे गाव पूर्णतः बंदच राहणार आहे. तसेच संचारबंदीच्या आदेशाचे पोलिसांकडून काटेकोर पालन केले जाणार असल्याचे दौंड उपविभागाच्या पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर न्हावरे पोलिस दुरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी कठोर कारवाई करणार आहेत. महसूल विभागाने न्हावरे गावचा तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून सील केला आहे. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गावात प्रवेश देण्यात येणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
न्हावरे गावात करोना रुग्ण सापडल्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत उपाययोजना व खबरदारी म्हणून विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख,शिरूरचे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, माजी जि.प.सदस्य.वसंतराव कोरेकर, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, मंडलाधिकारी मनीषा खैरे, ग्रामविकास अधिकारी पी.सी.केदारी, तलाठी माधव बिराजदार,माजी सरपंच गौतम कदम, माजी उपसरपंच अरुण तांबे,संभाजी बिडगर, सुभाष कांडगे,बिरदेव शेंडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.