प्रतिकारशक्तीसाठी श्री विश्ववती आयुर्वेद केंद्रातर्फे गोळ्यांचे वाटप
नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या त्रासाने अवघे विश्वच जखडले आहे. प्रत्येकजण संकटातून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशावेळी घरोघरी वृत्तपत्र वाटप करणाऱ्या विक्रेत्यांनी स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारावर लक्ष्य केंद्रीत करावे, असे विचार नगर शहर वृत्तपत्र विक्रेता संघाचे उपाध्यक्ष संजय गोरे यांनी व्यक्त केले.
सावेडी येथे विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट (कोल्हापूर) संचलित श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र व नगर येथील दिव्यस्पर्श पंचकर्म केंद्र यांच्यातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना मोफत 150 विक्रेत्यांना रसमाधववटी या आयुर्वेदीक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे सचिव प्रमोद पंतम, सदस्य राहुल लिमये, पुरुषोत्तम मडूर, विजय मते अदिंसह विक्रेते उपस्थित होते.
गोरे म्हणाले, “करोनाच्या संकटात आपल्याला सावेडीमधील होमिओपॅथी डॉक्टर्स वृत्तपत्रांच्या कार्यालयामार्फत अर्सेनिक गोळ्या, मास्क, सॅनिटायझर्स वाटप करण्यात आले. याचा लाभ सर्वांनी घेतला. आज या ट्रस्टतर्फे गोळ्यांचे वाटप करण्यात आले. डॉक्टर्स देखील सेवाभावी वृत्तीने हे काम करतात हे त्यांनी प्रसिद्धी न करता हे काम केले आहे हे दिसून येते.”
ट्रस्टच्या डॉक्टरांनी सर्व विक्रेत्यांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही नियमावली सांगून करोनाच्या लढ्यात विक्रेते देखील आपली सेवा अखंडीत देत असल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. विजय मते यांनी आभार मानले. यावेळी सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्यात आले.