नाशिक – राज्यातील एसटी कर्मचाऱ्याचे हाल होताना दिसून येत आहे. तुटपूंजा पगार असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तोही वेळेत मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्येची प्रकरणे समोर येत आहेत. मिळणाऱ्या पगारावर आपला घर खर्च कसा चालवावा हा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या मात्र आता एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
अशीच एक घटना नाशिक मधील मालेगावातून समोर आली आहे. येथील एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने वडिलांच्या कमी पगारामुळे हेव तसे शिक्षण घेता येत नाही म्हणून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
हा एसटी कर्मचारी मालेगाव आगारात चालक असून शिवदास शिंदे असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार समोर येताच मुलाला मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.