लोणीकंद पोलीस व ग्रामपंचायतीचे नियोजन; सुरक्षित अंतर राखून विक्री
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली बाजारतळ मैदानामध्ये दैनंदिन बाजारात एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, फळे विक्रेत्यांची वॉर्डनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. लोणीकंद पोलिस आणि वाघोली ग्रामपंचायतीने बाजारतळातील ३२ भाजीपाला विक्रेत्यांचे नियोजन करून सोसायटी, मुख्यरस्त्यांवर ग्राहकांसोबत सुरक्षित अंतर राखून विक्री करण्यास परवानगी दिली आहे. दैनंदिन बाजार काही दिवस बंद असणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत, लोणीकंद पोलीस, आरोग्य विभाग अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्येच वाघोली बाजारतळ मैदानामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत असल्याने या गर्दीवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व ग्रामपंचायत वाघोलीच्या वतीने एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.
भाजी विक्रेत्यांची वॉर्ड नुसार व्यवस्था करण्यात आली आहे. सोसायटी परिसर, मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांना ठिकाण ठरवून भाजीपाला विक्री करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. विक्रेत्यांच्या नावासह, मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांना आपल्या परिसरातील भाजी विक्रेत्यांची नावे, ठिकाण समजणार आहेत. भाजीपाला विक्री करताना काही अंतर राखून माल दिला जात आहे.
भाजीपाला विक्रेत्यांसह किराणा दुकानांमध्ये स्वच्छता राखून ठराविक अंतरावरून माल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुकानदार सूचनांचे पालन करताना दिसत आहेत. पोलिसांच्या विनंतीवरून काही किराणा दुकानदारांनी घरपोच माल देण्याची व्यवस्था केली आहे.
विक्रेत्यांसाठी पोलिसांकडून वाहन पासची व्यवस्था
औषध, भाजीपाला, किराणा या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी पुणे शहर परिसरात जाणाऱ्यांना लोणीकंद स्टेशनच्या वतीने पासची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर परिसरात जाण्यासाठी विक्रेत्यांना वाहन पासची गरज असेल तर लोणीकंद पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.