राजगुरूनगर(प्रतिनिधी) : राजगुरूनगर नगरपरिषद व जैन धर्मार्थ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून “डॉक्टर आपल्या दारी” हा उपक्रम आजपासून सुरु केला असून शहरातील नागरिकांची करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्डिया ऍम्ब्युलन्स द्वारे तपासणी केली जाणार आहे.
करोना विषाणूच्या महामारीला आळा घालण्यासाठी राजगुरूनगर नगर परिषदेच्या माध्यमातून जनजागृती व लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. याबरोबरच शहरातील व्यापारी आणि नगर परिषद प्रशासनाच्या आवाहनानुसार शहरात दि १५ पर्यंत बंद पाळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची घरपोच डिलिव्हरीची घोषणा व्यापाऱयांनी केली आहे. पोलीस महासूल आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहेत. राजगुरूनगर शहर लॉकडाऊन आहे. सेवाभावी संस्थांचा यात मोठा पुढाकार आहे.
शहरातील नागरिकांचे आरोग्य ठणठणीत राहावे, करोना विषाणूची बाधा होऊ नये, त्यांच्यातील भीती दूर व्हावी.याबरोबरच इतर आजारांबाबतची तपासणी व्हावी यासाठी अखिल भारतीय जैन संघटना, सकल जैन संघ, प्रमोद सुधाची चॅरिटेबल ट्रस्टच्या जैन धर्मार्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून राजगुरूनगर नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
सुरवातीला शहरातील महसूल, पोलीस, पत्रकार, नगर परिषद कर्मचारी या समाजासाठी धावणाऱ्या व्यक्तींची तपासणी आज करण्यात आली. उद्यापासून शहरातील वार्ड निहाय नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. जैन धर्मार्थ दवाखान्याचे डॉ सुरज वानखेडे, डॉ पायल खोडके, डॉ जया हे कार्डिया ऍम्ब्युलन्स द्वारे नागरिकांची तपासणी केली जणार आहे.
करोना विषाणूला थोपवण्यासाठी “डॉक्टर आपल्या दारी” या उपक्रमातून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, नगरअध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या उपस्थित झाले. यावेळी सकल जैन संघाचे अध्यक्ष प्रदीप कासवा. प्रमोद सुधाची चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष विजय भन्साळी, अध्यक्ष संतोष बोथरा, सचिव प्रशांत कर्नावट, मुख्याधिकरी मछिंद्र घोलप, नगरसेवक, संपदा सांडभोर, बापू थिगळे, रेखा क्षोत्रीय, सारिका घुमटकर, मंगेश गुंडाळ, निलेश घुमटकर, किशोर ओसवाल, सचिन मधवे, रफिक मोमीन, मनोज कासवा, अमर टाटिया, राजू जाधव, प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी सांगितले कि, शहरात करोना विषाणूंचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनची तंतोतंत अंमलबजावणी केली जात आहे. शिवाय व्यापारीवर्गाचे सहकार्य लाभल्याने गेली सहा दिवस शहर बंद आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी डॉक्टर आपल्या दारी हा या काळात उपक्रम सुरु केला आहे. अखिल भारतीय जैन संघटना, जैन धरमार्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची आरोग्य तासपाणी मोफत केली जाणार आहे. सुरुवातील पोलीस अधिकारी कर्मचारी, महसुली विभागाचे अधिकारी कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उद्यापासून वार्ड निहाय नागरिकांची आरोग्य तपासणी, करोना विषाणू प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून मोफत तपासणी करून घ्यावी.
विजय भन्साळी यांनी सांगितले, करोना महामारीचा सामना करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न सुरु आहेत. जैन धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून कार्डिया ऍम्ब्युलन्स द्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातून हॉस्पिटलचे डॉक्टर घरी येऊन मोफत तपासणी करणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.