डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : करोना संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता झारगडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईड निर्जंतुकीरण औषधाची फवारणी करत करुन गावात जनजागृती करण्यात आली. झारगडवाडी ग्रामपंचायतच्या वतीने फ्लेक्स, फलकबोर्ड, हस्तप्रत्रिका, कोरोना विषाणुबाबत जनजागृतीसाठी ऑडिओ गीत अश्या पध्दतीने जनजागृती करत संपूर्ण गावाचे सोडियम हायपोक्लोराईड निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली आहे.
तसेच आरोग्य उपकेंद्रामार्फत झारगडवाडीत बाहेरून आलेल्या २४० नागरिकांची नावनोंदणी करुन त्यापैकी १४० जणांच्या हातावर कोरंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत तसेच त्या सर्वांना 14 घराबाहेर न फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आशासेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेवक, सेविका यांच्या माध्यमातून संपूर्ण गावातील स्थानिक रहिवाशांचे सर्वेक्षण करुन किरकोळ औषध उपचार करण्यात आले आहेत.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र डोर्लेवाडी आणि झारगडवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आले की, प्रत्येकाने घरात राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. तसेच सर्दी, खोकला, ताप व घशात घवघवणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित प्राथमिक आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा. असे आव्हान झारगडवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता लांडगे व ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
तसेच संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराईड निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यासाठी सदस्य पोपट कुलाळ, नानासो देवकर, राहुल झारगड, अजित बुरुंगले, राहुल झारगड, अजित बोरकर, गणेश साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष रणजित बोरकर, पत्रकार नवनाथ बोरकर , कर्मचारी अनिल माने, बापूराव महाडिक, लक्ष्मण जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.