धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा 13 मार्च, 2020 पासून लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पणन महासंचालनालयाच्या परिपत्रकात नमूद सुचना विचारात घेवून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेवून जीवनावश्यक शेत मालाचे खरेदी विक्रीचे कामकाज सुरळीतपणे चालू राहील, यासाठी जिल्हा प्रशासन व बाजार समिती यांचेमध्ये समन्वय ठेवण्यासाठी खालील नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
1. श्री.विलास गावडे, उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे तालुका व श्री.व्ही.जी. भडागे, सहकार अधिकारी (प्र.श्रे.) अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे तालुका : धुळे कृषि उत्पन्न बाजार समिती, धुळे
2. श्री.एस.बी.फुलपगारे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, साक्री व श्री.जी.डी.महाले, सहकार अधिकारी (प्र.श्रे.) अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, साक्री : साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती, साक्री.
3. श्री.ए.डी.बागल, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर व श्री.एन.डी.वाणी, सहकार अधिकारी (प्र.श्रे.) अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती शिरपूर.
4. श्री.एस.एस.गिते, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिंदखेडा व श्री.आर.पी.दाऊळकर, मुख्यलिपीक अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था शिंदखेडा : शिंदखेडा कृषि उत्पन्न बाजार समिती, शिंदखेडा.
या अधिकाऱ्यांनी बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व बाजार घटकांचा प्रवेश नियंत्रित करण्यासाठी दररोज केवळ 150 शेतकऱ्यांना/ वाहनांना आगावु टोकन देवून निश्चित/ ठरवून दिलेल्या दिवशीच त्यांना प्रवेश देण्याबाबत तसेच बाजार समितीच्या कामकाजावर देखरेख व सनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडावयाची आहे.
त्याच बरोबर बाजार समितीकडून प्रत्येक व्यक्तीचे थर्मल टेंपरेचर स्क्रिनिंग करणे, प्रवेशव्दाराजवळ हात निर्जंतुकीकरणासाठी उपाययोजना करणे, प्रत्येक व्यक्तीने तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग बाबत वांरवार उद्घोषणा करणे व फलकाव्दारे आवाहन करणे, बाजार संपल्यानंतर सोयीची वेळ निश्चित करून सोडियम हायपोक्लोराईट किंवा अन्य रसायनांची फवारणी आदी कामे बाजार समितीकडून करुन घेण्यासाठी समन्वय साधणे.
वरील प्रमाणे नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिनस्त मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा यथोचित वापर करून जिल्ह्यातील बाजार समितीत्यांच्या आवारामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जीवनावश्यक शेतमालाचे खरेदी विक्रीचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहील यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही व उपाययोजना बाजार समितीमार्फत करवून घ्याव्यात. केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करावा. सदर कामी टाळाटाळ अथवा हगर्जीपणा अथवा दिरंगाई केल्यास संबंधित नोडल अधिकारी यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल असेही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.