बुलढाणा – संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून बुलढाणा जिल्ह्यातही या कोरोनाचे 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर यातील एकाचा अगोदरच मृत्यू झाला आहे. या कोरोनाला थांबवायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग हा एक पर्याय आहे. म्हणूनच आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः चिंचोले चौकातील भाजी मार्केटला, मेडिकल स्टोअर्सला व रिलायन्स मार्टला प्रत्यक्ष भेट देऊन जनतेने सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन केले.
कोरोना हा संसर्गजन्य रोग असून कोरोनाबाधित व्यक्तीच्या एक मीटरच्या संपर्कात आल्यावर याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे जनतेने एकमेकांपासून किमान एक मीटर अंतरावर उभे राहणे गरजेचे आहे. जनतेला भाजीपाला, अन्न धान्य, मेडिकल मिळावे म्हणून या सर्व सेवांना राज्य सरकारने लॉकडाऊनमधून वगळले. त्यामुळे ही सर्व दुकान सुरू असून काही ठिकाणी गर्दी होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्यामुळे राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बुलढाणा शहरातील चिंचोले चौकात भरविण्यात आलेल्या भाजीपाला बाजाराला भेट दिली. याठिकाणी जाऊन त्यांनी तिथल्या विक्रेत्यांशी ग्राहकांशी चर्चा केली व त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी चिंचोले चौकातील एका मेडिकल स्टोअर्सला भेट देऊन सॅनिटायझर, मास्क व औषधी याबाबतची माहिती घेतली. मेडिकल स्टोअर्स धारकांना व ग्राहकांना काही अडचणी येत आहेत का याचीदेखील त्यांनी विचारणा केली. तसेच शहरातील रिलायन्स मार्टला भेट देऊन त्याठिकाणी देखील सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते का याची पाहणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आज बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आठ झाली असून जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही परंतु आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं, अन्यथा घरातच थांबून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.