जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅनचा शुभारंभ
बुलढाणा : कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले आहे. प्रत्येक देशात कोरोनाने पाय पसरले आहे. आपल्या देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जिल्ह्यातही कोरोनाबाधित रूग्ण आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभाग राबत आहे. संचारबंदीचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहे, प्रसंगी कारवाईसुद्धा करीत आहे. कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री यांच्याहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते. प्रास्ताविकात मोबाईल व्हॅनच्या निर्मितीमागील भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केले. त्यांनी व्हॅनमुळे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचावासाठी चांगलाच उपयोग होणार असल्याचे सांगितले. संचलन नरेंद्र लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बुलडाणा पोलीस मोटार परिवहन विभागातील ‘फोर्स मोटर्स लाईट व्हॅन’ या वाहनाचा उपयोग संबंधित सुविधेसाठी करण्यात आला आहे. या वाहनामध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टम बसवण्यात आली असून वाहनाच्या टपावर ७५० लिटर क्षमतेच्या टाकीचा वापर या कामासाठी करण्यात आला आहे. या टाकीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून पाईपद्वारे गाडीच्या आतील भागात सोडण्यात आले आहे. ही मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरणासाठी फिरणार आहे. या व्हॅनमधून ६ ते ७ सेकंदात पोलीस कर्मचारी सॅनिटायझिंग होऊन बाहेर पडणार आहे.