भाजप-शिवसेना युती होणार? मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई – औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले.

व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचे स्वागत असे विधान केले आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असून मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत तर नाहीत ना, असी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असे विधान केले होते. देहूमध्ये एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले असता एकाने त्यांचा माजी मंत्री असा उल्लेख केला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल, असे म्हंटले होते. काल चंद्रकांत पाटील आणि आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरुन, शिवसेना-भाजपच्या युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपची साथ सोडली आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोप झाले. पण आता दोन वर्षांनी शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा युतीची चर्चा रंगू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.