महिलांच्या हॉकीत भारताची उरूग्वेवर मात

हिरोशिमा – जोरदार आक्रमक चालीं करीत भारताने उरूग्वेवर 4-1 अशी मात केली आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत विजयी प्रारंभ केला.

भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचा प्रत्यय घडविला. भारताकडून कर्णधार पूनम राणी (10 वे मिनिट), गुर्जंट कौर (21 वे मिनिट), ज्योतिकुमारी (40 वे मिनिट) व लालरेम सियामी (56 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. उरूग्वे संघाचा एकमेव गोल मारिया तेरेसा व्हिआना हिने 51 व्या मिनिटाला नोंदविला.

सामन्याच्या प्रारंभापासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. दहाव्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी चालून आली. पूनम राणी हिने प्रतिस्पर्धी संघातील दोन खेळाडूंना चकवित गोल केला आणि संघाचे खाते उघडले. हा गोल झाल्यानंतर भारताने आणखी चाली केल्या. मात्र, दुसरा गोल होण्यासाठी त्यांना 21 व्या मिनिटापर्यंत वाट पहावी लागली. मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरचा उपयोग करीत गुर्जंट कौर हिने खणखणीत फटका मारला आणि संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला भारताने 2-0 अशी आघाडी मिळविली होती.

उत्तरार्धातही सुरूवातीपासून भारताने आपला दबदबा कायम ठेवला. त्याचा फायदा त्यांना लगेच मिळाला. 40 व्या मिनिटाला वंदना कटारिया हिने दिलेल्या पासवर ज्योतिकुमारी हिने अचूक फटका मारला व संघाची आघाडी 3-0 अशी वाढविली.

हा गोल झाल्यानंतर भारतीय बचाव फळीत शिथिलता आली. त्याचा लाभ घेत उरूग्वे संघाच्या मारिया हिने शानदार गोल केला. हा गोल झाल्यामुळे भारतीय खेळाडूंवर थोडेसे दडपण आले. त्यांनी पुन्हा जोरदार चाली सुरू केल्या. 56 व्या मिनिटाला पूनम राणी हिने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टच्या दिशेने चाल केली. तिने दिलेल्या पासवर सियामी हिने संघाचा चौथा गोल केला. त्यानंतर शेवटपर्यंत भारताने आघाडी टिकवित सामना जिंकला.

Leave A Reply

Your email address will not be published.