#CWC19 : संघाचा पराभव क्‍लेषकारक – गेल

लीड्‌स – कारकीर्दीतील अखेरच्या विश्‍वचषक स्पर्धेत आमच्या संघासा उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले हे माझ्यासाठी अतिशय क्‍लेषकारक असणार आहे. खूप नाराज होऊन मला हे दु:ख सहन करावे लागणार आहे असे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल याने सांगितले.

भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात गेल हा कारकीर्दीतील अखेरचा खेळून निवृत्त होणार आहे. तो म्हणाला की, आमच्या संघाकडून मला पाच विश्‍वचषक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली याच्यासारखे भाग्य असूच शकत नाही. माझ्यासाठी हा प्रवास अतिशय संस्मरणीय आहे. तरीही अखेरच्या स्पर्धेत आम्ही साखळी गटातच पराभूत झालो याची बोच मला आयुष्यभर राहणार आहे. शेवटच्या सामन्यात आम्ही अफगाणिस्तानला हरविले तरीही हा विजय माझे दु:ख विसरण्यासाठी अपुराच आहे.

खरतर विश्‍वचषक जिंकूनच निवृत्त होण्याची माझी इच्छा होती. परंतु काही वेळा आपल्या मनासारखे घडत नसते. कदाचित दोन वर्षे विश्रांती घेत पुन्हा मी विश्‍वचषकात भाग घ्यावा अशी माझ्या सहकाऱ्यांची व चाहत्यांची इच्छा असेल. मात्र, मी आता चाळिशी पार करीत आहे व आता शारीरिक तंदुरुस्तीशी तडजोड करणे अवघड आहे. विनाकारण जीव धोक्‍यात घालण्याची माझी बिल्कुल इच्छा नाही. प्रत्येक खेळाडूच्या तंदुरुस्तीबाबत मर्यादा असतात.

भारताविरूद्धच्या मालिकेत कोणते सामने खेळणार असे विचारले असता गेल म्हणाला, त्याबाबत अद्याप काही ठरविलेले नाही. आमची निवड समिती ठरविल, त्याप्रमाणे मी खेळणार आहे. एकतरी सामना मला खेळायला मिळेल अशी मला आशा आहे.

– दृष्टीक्षेपात गेलची कामगिरी

गेल याने पाच विश्‍वचषक स्पर्धेत भाग घेतला.

एकूण सामने 34 , डाव खेळले 33 – एकूण धावा 1,179
(शतके 2 ,अर्धशतके 6 ,चौकार 115 ,षटकार 49)

सर्वोच्च कामगिरी- 2015 च्या विश्‍वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरूद्ध 215 धावा
तसेच त्याने 19 डावांमध्ये गोलंदाजी केली व त्यामध्ये त्याने 15 विकेट्‌स घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.