पिंपरीचिंचवड : शहरात सोमवारपासून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

पिंपरी – दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय महापालिकेने आठवडाभरातच बदलला असून सोमवारपासून (दि. 19) आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. एका दिवशी, एकेका भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असून त्याचे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाने आज जाहीर केले.

पिंपरीचिंचवड : एक दिवस पाणी पुरवठा बंदचे वेळापत्रक

महापालिकेकडून शहराला दररोज सरासरी 480 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. पवना धरण शंभर टक्के भरल्यानंतर 7 ऑगस्टपासून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या व नळजोडांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या शुद्धीकरण व वितरण व्यवस्थेवर ताण पडत आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर शहरातील सर्व भागांमधून पाणी कमी दाबाने, कमी वेळ अथवा काही ठिकाणी पाणीच येत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. महापालिकेची पाणीपुरवठ्याची स्थापित क्षमता व वाढती लोकसंख्या विचारात घेता तसेच समन्यायी (समान) पाणी वाटपासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येक मुख्य नलिकेवरील एक- एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद केल्यास या भागातील पाणी इतर भागास वितरणासाठी उपलब्ध होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा करीत महापालिकेने सोमवारपासून आठवड्यातून एकेका भागातील एक दिवस पाणी बंद करुन पाणी वितरणाचे नियोजन केले आहे.

नागरिकांनी अनावश्‍यक पाणीसाठा करु नये. पाणी शिळे होत नाही. त्यामुळे शिल्लक पाणी फेकून देऊ नये. जमिनीखालील टाक्‍या, इमारतींवरील टाक्‍यांचे वॉटर प्रुफींग सुस्थितीत आहे, याची खातरजमा करावी. तसेच घरातील नळ, फ्लश, पाईपलाईन चांगल्या दर्जाचे वापरावेत. तसेच त्यामधून गळती होऊ नये, या कामी काळजी घ्यावी. घरातून बाहेर जाताना नळ, फ्लश बंद आहेत, याची खातरजमा करावी. टाक्‍या ओव्हर फ्लो होऊ देऊ नये. नागरिकांनी आवश्‍यकतेनुसार पाणी जपून वापरुन पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच पाण्याशी संबंधित तक्रार सारथी हेल्पलाईनला 8888006666 या क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.