नवी दिल्ली – क्रिकेटपटू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर दडपण आणण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवत असतात. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही अशीच युक्ती लढविली होती, मात्र चाणाक्ष पंचांनी ती ओळखली व कोहलीला तंबी दिली.
या कसोटीत भारताला न्यूझीलंडकडून 7 गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडच्या डावात टॉम लॅथम व टॉम ब्लंडल चांगली फलंदाजी करत होते. या जोडीने शतकी सलामी दिली होती. लॅथमने चेंडू पुश करून एकेरी धाव घेण्यासाठी ब्लंडलला कॉल दिला. अशी धाव घेताना फलंदाज एकेरी धावेचे रूपांतर दुहेरी धावेत करण्यासाठी वेगाने धावतात व प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकांवर दडपण आणतात. मात्र, यावेळी ते केवळ एक धाव घेण्यासाठी धावत असताना कोहलीने दोन (रन फॉर टू) अशी हाक दिली.
खरेतर एक फलंदज आपल्या सहकारी फलंदाजाला अशी हाक देतो इथे मात्र कोहलीने ही हाक दिली. पंच रिचर्ड कॅटलबरो यांना कोहलीचा डाव लक्षात आला व त्यांनी लगेचच त्याला समज दिली. फलंदाजांमध्ये गैरसमज व्हावा व त्यातील एक धावबाद व्हावा यासाठी केलेली कोहलीची ही कृती पंचांच्या लक्षात आली.
भारतीय क्षेत्ररक्षकांनी चुकून दोन धावा देऊ नये व चपळ क्षेत्ररक्षण करावे यासाठी मी हाक दिल्याची सारवासारव कोहलीने केली. मात्र पंचांनी कोहलीचे मत फेटाळले व असे वर्तन पुन्हा करू नको अशी समज दिली.