मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या इडीची नोटीस आल्यानंतरही चौकशीसाठी इडीच्या कार्यालयात गेल्या नाहीत. त्यांनी या नोटीशीला पाच जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याची मागणी केली असल्याचे अंमलबाजवणी खात्यातील सूत्रांनी सांगितले.
अंमलबाजावणी संचनालयाने त्यांच्या मागणीवर काय निर्णय घेतला आहे, याबाबत तातडीने माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेतून 55 लाख रूपयांचे कर्ज दहा वर्षापुर्वी घर घेण्यासाठी घेतले होते. त्याचा संबंध या बॅंकेत झालेल्या घोटाळ्याशी जोडून ही चौकशी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
अंमलबजावणी संचनालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या पुर्वी चौकशीसाठी हजर होण्याची दोन समन्स पाठवली आहेत. हे समन्स तिसरे होते. यापुर्वी त्यांनी आरोग्याच्या कारणावरून येण्यास असमर्थता दर्शवली होती असे या सूत्रांनी सांगितल्याचे आऊटलूक या नियतकालिकाच्या संकेतस्थळावरील बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी हे राज्य सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. भारतीय जनता पक्षाला हे प्रकरण जड जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता.