“जास्त अंगावर याल तर हात धुवून मागं लागेन”- उद्धव ठाकरे विरोधकांना इशारा

मुंबई  – ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? जास्त अंगावर याल; तर हात धुवून मागे लागेन, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार उद्या (शनिवार) एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्याचे औचित्य साधून ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकाला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर करून सुडाचे राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. यंत्रणांचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा.

मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनी त्यांनाही कुटूंब, मुलंबाळं असल्याचे विसरू नये. आमच्यावर संस्कार असल्याने आम्ही संयम बाळगला आहे, असे त्यांनी म्हटले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित ठिकाणांवर नुकतेच ईडीने छापे टाकले. त्यावेळी सरनाईक यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली. त्यापार्श्‍वभूमीवर, ठाकरे यांनी ईडी, सीबीआयबाबतची भूमिका मांडली.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून राजकीय धाडस दाखवले. आमचे पक्ष एकत्र येणार नाहीत असे काहींना वाटत होते. शिवसेना आपल्या मागे फरफटत येईल, असा त्यांचा समज होता.

पण, तो फोल ठरला, अशा शब्दांत ठाकरे यांनी नामोल्लेख टाळून भाजपवर निशाणा साधला. राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष मिळून-मिसळून कार्य करत आहेत. याआधी आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. आता एकत्र आल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी अतिशय आपुलकीने आणि आदराने वागतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.