राज्यात करोनाची ‘सुनामी’ येईल; मुख्यमंत्र्यांचे नागरीकांना काळजी घेण्याचे पुन्हा आवाहन

हे उघडा, ते उघडा असे सांगणाऱ्यांवर कोणतीही जबाबदारी नाही

मुंबई – राज्यात करोनाची दुसरी, तिसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ही केवळ लाटच नसेल तर ती करोनाची सुनामीही असू शकते याची भीती आहे. त्यामुळे सर्वांनीच पुन्हा नीट काळजी घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा ते उघडा अशी मागणी करणाऱ्यांवर त्याची कोणतीच जबाबदारी नाही असे नमूद करीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.

आज ऑनलाईन माध्यमातून जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये करोनामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले आहेत. आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्यालाही असे काही कडक उपाय योजावे लागतील असे ते म्हणाले.

आत्तापर्यंत करोनामुळे आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले त्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो, कार्तिकी एकादशीच्या बाबतीतही आपल्याला हीच काळजी घ्यावी लागेल असे सूचक विधानही त्यांनी केले. छट पुजा संयमाने पार पाडल्याबद्दलही त्यांनी आभार मानले.

राज्यातील मंदिरे आपण उघडली पण तेथेही सध्या गर्दी वाढताना दिसत आहे असे त्यांनी नमूद केले. लसीच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की ही लस लवकरच येईल असे सांगितले जात आहे त्याचेही नियोजन आपल्याला करायचे आहे.

राज्यातील साडेबारा कोटी जनतेला या लसीचे 25 कोटी डोस द्यावे लागतील असेही त्यांनी नमूद केले. पोस्ट कोविडचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत त्यामुळे आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडा असे आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.