नवी दिल्ली – लडाखला चीनच्या हद्दीत दर्शवल्याबद्दल संसदेच्या संयुक्त समितीकडून ट्विटरची झाडाझडती घेतली आहे. या संदर्भात ट्विटरने दिलेले स्पष्टिकरण अपुरे असून या गुन्ह्याबद्दल 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे या समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी यांनी बुधवारी सांगितले.
लडाखला चीनचा भाग म्हणून दर्शवल्याबद्दल ट्विटरच्या प्रतिनिधींची संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी केली गेली. ट्विटरला भारताच्या संवेदनशीलतेचा आदर वाटत आहे, असे स्पष्टिकरण ट्विटरने दिले. पण ट्विटरने दिलेले हे स्पष्टिकरण अपुरे असल्याबद्दल समितीच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत झाले असल्याचे लेखी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
हा मुद्दा केवळ संवेदनशीलतेपुरताच मर्यादित नाही. हा मुद्दा भारताच्या सार्वभौमत्वाशी आणि अखंडतेशी संबंधित आहे. लडाखला चीनच्या हद्दीमध्ये दर्शवणे हा गुन्हा असून त्यासाठी 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे लेखी यांनी सांगितले.
सार्वजनिक धोरण विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापिका, शागुफ्ला कामरान, कायदेशीर सल्लागार आयुषी कपूर, पल्लवी वालिया आणि मानविंदर बाली या प्रतिनिधींनी ट्विटर इंडियाच्यावतीने संयुक्त संसदीय समितीपुढे जबाब नोंदवला.
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय आणि कायदा व न्याय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही समितीसमोर निवेदन सादर केले होते.