टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली गेली असली तरीही ही स्पर्धा फार लांबणार नसून जपानमधील उन्हाळ्यापूर्वी ही स्पर्धा घेतली जाईल. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जाहीर केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येतील. अर्थात जपानच्या तयारीला कोणताही फटका न बसता लवकरात लवकर होतील. ही स्पर्धा तेथील उन्हाळ्यापूर्वीच होतील. जपानमधील उन्हाळा अन्य देशांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे तेथील वातावरणाशी जुळवून घेणे अनेकांना कठीण जाते. खेळाडूंना असा कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा विचार करण्यात येत आहे, असेही समितीचे अध्यक्ष यशिरो मुरी यांनी स्पष्ट केले आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना, संयोजन समिती, प्रायोजक, राष्ट्रीय क्रीडा संघटना तसेच प्रक्षेपण यंत्रणा यांच्याशी बैठक घेऊन नवे वेळापत्रक तयार केले जाणार असल्याचेही मुरी यांनी सांगितले.
वेळापत्रकाबाबत को चिंतेत
ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या वेळापत्रकाबाबत जागतिक ऍथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांना चिंता वाटत आहे. या तारखा प्रत्येक देशाला मान्य होतील का अशी त्यांना शंका वाटत आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार ही स्पर्धा घेण्यात आली असती तर खूप चांगले झाले असते मात्र, आता नव्या तारखा प्रत्येकालाच मान्य असतील याबाबत आपल्याला शंका वाटते असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.
पात्र खेळाडू कायम राहणार
या स्पर्धेसाठी जगभरात ज्या पात्रता स्पर्धा झाल्या व त्यातून ज्या खेळाडूंनी पात्रता मिळविली त्यांचा स्पर्धेतील सहभाग कायम राहणार आहे. उलट त्यांना थेट प्रवेश मिळेल असेही महासंघाने स्पष्ट केले आहे. या स्पर्धेस पात्र झालेले जवळपास 11 हजार खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.
हॉटेल, पर्यटनाला फटका
टोकियोतील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्यामुळे जपानमधील हॉटेल व पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. टोकियोतील अनेक हॉटेलचे बुकिंग रद्द झाले आहे. या हॉटेल चालकांनी नूतनीकरण तसेच विविध सुविधा तयार केल्या होत्या त्यावर झालेला खर्च वाया जाणार आहे. केवळ निवासी बुकिंगच नव्हे तर जपानमधील पर्यटन व्यावसायही अडचणीत आला आहे.