ग्रामपंचायत निवडणूक: प्रलोभने, आश्वासनांच्या आमिषांची खैरात; मतदारांकडूनही प्रत्येक उमेदवाराला दिलासा

थेऊर –सध्या ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असून अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष असल्याने मतदारांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने मोहीत करण्यासाठी विविध प्रलोभने व आश्वासनांच्या आमिषांची खैरात होत आहे.

तरीही चाणाक्ष मतदार प्रत्येक उमेदवाराला झुलवत ठेवून ‘साहेब, चिंता करू नका, तुमचीच हवा आहे, अहो आम्ही तर तुमचेच ना.. !’ असा प्रत्येकाला दिलासा देत नकार न देण्याचा फंडा आजमावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मतदार विजयी मिरवणुकीत गुलाल टाकणार की उमेदवारांना घरात बसवणार, हे 18 जानेवारी रोजी मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील साडेसातशे गावात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचत आहे. निवडणूक म्हटली की, श्रीमंत असो वा गरीब सर्वांचीच चंगळ असते. उमेदवारही कसलीच कुचराई न करता मतदान होईपर्यंत कार्यकर्ते व मतदारांचे लाड पुरविण्यात मग्न झाले आहेत.

अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागांतील जनता, कार्यकर्ते यांना सांभाळून त्यांची मर्जी राखणे जिकरीचे काम मोठ्या शिताफीने करावे लागते. त्यासाठी उमेदवाराच्या नाकीनऊ येते. केवळ मताचे दान आपल्या पारड्यात पडावे म्हणून हे सारे सहन करून मतदारांना खूश करण्यासाठी वाटेल ते केले जात आहे. तेव्हाच कुठे मतदार आपली खरी ओळख देत आहेत.

या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी प्रभागासमवेत गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बहुतांश नागरिकांतून केला जात आहे. याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोशल मीडिया व वर्तमानपत्र यामुळे निवडणूक आणि मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. उमेदवार मात्र अद्यापही कार्यकर्त्यांची जुळवा – जुळव करताना दिसत आहेत. निवडणुकीत होणारा खर्चही सामान्यांचा आवाक्‍याबाहेरचा आहे. अशा व इतर अनेक राजकीय चर्चेला सध्या ग्रामीण भागात उधाण आले आहे.

मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या नाही तर मतदार आपल्याला मतदान करणार नाही. आणि आपण घराचा दरवाजा ठोठावला तर नाराजीला सामोरे जावे लागेल. मग ते आपल्याला मतदान करतील का? अशा द्विधा मनस्थितीत प्रचारक व उमेदवार सापडले आहेत. सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका येत असतात.

त्यामुळे “नेमेची येतो दारी उमेदवार’ याप्रमाणे विचार करून आता मतदारराजाने आमचे मतदान तुम्हालाच पण वारंवार येऊन त्रास देऊ नका, असाच उपरोधिक टोला या गळ्यात पडणाऱ्या प्रचारकांना दिल्याचे दिसून येते. ‘भावनाओ को समझो’ म्हणत निदान दुपारच्या प्रहरी तरी वामकुक्षी घेऊ द्या, काही वेळ उसंत घेऊ द्या असे मतदार म्हणत असताना दिसत आहेत.

चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरवात झाली असून, पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी तर काही मोठ्या गावात चौरंगी सामना होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. पॅनल जास्त असलेल्या ठिकाणी मतदारांना कोण उमेदवार कोणत्या पॅनलमधून उभा आहे? याची खात्री करुन घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. आम्हीच कसा गावाचा थांबलेला विकास करु शकतो पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गावात जुन्यासह नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. तरूणांचा अनेक गावात उत्साह असल्याचे चित्र आहे. सध्या गावासाठी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी विषय निवडणुकीत ऐरणीवर आले असून गावविकासाच्या गप्पांना वेग आला आहे.

रिमोट कंट्रोल हातात ठेवण्याचा प्रयत्न
ग्रामीण भागात सध्या विविध शेतीकामे सुरु आहेत. त्यामुळे सकाळी व रात्री कार्यकर्ते गल्लीबोळातून, घरोघरी फिरुन निवडणूकीनंतर आम्ही काय करणार आहोत? याचा पाढा वाचत आहेत. मतदार मात्र नाइलाजाने; परंतु चाणाक्षपणे मतदान तुम्हालाच… असे सांगून उमेदवारांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. गावातील मुख्य रस्ते, चौक, चावड्या गजबजल्या असून हॉटेलवर चहापाणी मागवले जात आहे. या निवडणुकीत जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काहीजण स्वतः रिंगणात नसले तरी रिमोट कंट्रोल हातात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र बऱ्याच गावांत दिसत आहे.

करोनाकाळात पुणे-मुंबईकरांना टाळणारे आता प्रेमात
करोना मारामारीच्या सुरूवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये गावागावात पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून कोण आले यांवर अनेकांच्या नजरा होत्या. त्यावेळी त्यांना कसे टाळता येईल तसेच गावबंदी करून क्वारंटाइन करण्यासाठी अनेक स्वयंघोषित नेते पुढे आल्याने अनेक ठिकाणी वाद झाले. आता तेच वाद घालणारे आपले पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्या मतदार राजाला त्याचे कुटुंबासमवेत मतदानासाठी गावात कसे आणता येईल. त्यांचा शोध घेऊन नियोजन करण्यात अनेकजण मग्न असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.