26/11 हल्याच्या मास्टर माईंडची माहिती देणाऱ्याला ‘हा’ देश देणार 50 लाख डॉलरचं बक्षिस

वॉशिंग्टन – मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाल्यावर या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला लष्कर ए तोयबाचा सदस्य साजिद मीर याच्याबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यास अमेरिकेने तब्बल 50 लाख डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे. “26/11’च्या हल्ल्यामध्ये प्रमुख भूमिका बजावल्याबद्दल साजिद मीरवर हे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेतील वरिष्ठ सदस्य साजिद मीर हा 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबद्दल “वॉन्टेड’ आहे. साजिद मीर बाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्याला अथवा पकडून देणाऱ्याला कोणत्याही देशातील व्यक्‍तीला 50 लाख डॉलरचे बक्षिस देण्यात येईल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

साजिद मीर हा मुंबईवरील हल्ल्यासाठी लष्कर ए तोयबाचा ऑपरेशन मॅनेजर होता. या हल्ल्याचे नियोजन, पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्येही तो सहभागी होता. मीर याच्यावर 21 एप्रिल 2011 रोजी अमेरिकेतील डिस्ट्रीक्‍ट कोर्ट, नॉर्दर्न डिस्ट्रीक्‍ट ऑफ इलिनोईज, इस्टर्न डिव्हीजन (शिकागो, इलिनोईज)ने दहशतवादी कृत्यांच्या खटला दाखल केला आहे.

त्याच्यावर विदेशातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, दहशतवाद्यांना सहाय्य करणे, अमेरिकेबाहेरील नागरिकांच्या हत्येसाठी सहाय्य करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे अरोप ठेवले गेले आहेत. 22 एप्रिल 2011 रोजी त्याच्या अटकेसाठी वॉरंटदेखील बजावण्यात आले आहे. “एफबीआय’च्या “मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या यादीमध्येही त्याचा समावेश केला गेला आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज महल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरीमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी ठिकाणी हल्ले केले होते. त्यात 166 जण मृत्यूमुखी पडले होते. हा हल्ला करणाऱ्यांपैकी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले होते. तर अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.