हैदराबाद – भाजपचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंडी संजय कुमार यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. इयत्ता दहावी परीक्षेची एक प्रश्नपत्रिका मेसेजिंग ऍपवर प्रसिद्ध झाली. त्यानंतर गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी कुमार यांच्यावर कारवाई केली.
तेलंगणामध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दहावी परीक्षेचा पेपर (प्रश्नपत्रिका) फुटला. त्यामागे काही विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. तर, दोघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांशी संगनमत करून कुमार यांनी पेपर फोडण्याचे कारस्थान रचले. त्यामागे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्याचे खापर तेलंगणा प्रशासनावर फोडण्याचा डाव होता, असा दावा पोलिसांनी केला.
मंगळवारची मध्यरात्र उलटल्यानंतर कुमार यांना त्यांच्या करीमनगरमधील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या परिसरात निदर्शने केली. तसेच, मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तेलंगणात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक जवळ येत असल्याने बीआरएस आणि भाजप वारंवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना दिसत आहेत. आता कुमार यांच्या अटकेमुळे दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष आणखी चिघळू शकतो.