तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे

पाण्याची नासाडी टाळा : पाणीपुरवठा समितीचे सभापती संग्राम काकडे यांचे आवाहन

तळेगाव दाभाडे – पवना धरणातील पाणीसाठ्यात कडक उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तसेच लांबणीवर गेलेल्या पावसामुळे तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समितीचे सभापती, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी केले.

तळेगाव शहराला पवना आणि इंद्रायणी नदीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यातून दररोज सुमारे दोन कोटी 10 लाख लीटर पाणी वापरण्यात येते. पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत आहे. पवना धरणातील पाणीसाठा अवघा 20 टक्‍के इतका शिल्लक राहिला आहे. मान्सून लांबणीवर पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
शहरातील काही नागरिक पाण्याचा वाजवीपेक्षा अधिक वापर करत असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी नळाला तोट्या नाहीत, घर व अंगणामध्ये सडा घालणे, दुचाकी-चारचाकी गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करणे तसेच काही नागरिक बांधकामासाठी पाण्याचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

भविष्य काळासाठी उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपरिषदेचे पाणी पुरवठा समितीचे सभापती संग्राम काकडे यांनी केले आहे.
तळेगाव शहरात इंद्रायणी पाणी पुरवठा योजनेतून नऊ एमएलडी आणि पवनेतून 13 एमएलडी लिटर पाणी रोज घेतले जात आहे. शहरातील एक लाख नागरिकांसाठी याचा वापर केला जातो. शहरासाठी पाणी साठविण्यासाठी एकूण दहा साठवण टाक्‍या लाखो लिटर क्षमतेच्या आहेत. त्याद्वारे शहराला पाणी पुरवठा होत आहे, असेही संग्राम काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.