‘या’ देशाच्या संसदेत प्रचंड ‘गोंधळ’; एकमेकांना लगावले ‘ठोसे’, भिरकावले मृत ‘डुकरा’चे अवयव 

तैपेई – तैवानमध्ये अमेरिकेतून पोर्क आणि बीफ आयात करण्याच्या धोरणाला मंजूरी देण्याच्या मुद्दयावरून तैवानच्या संसदेमध्ये अभूतपूर्व गदारोळ झाला. आक्रमक झालेल्या लोकप्रतिनिधींनी विरोधी गटांच्या लोकप्रतिनिधींना जबरदस्त ठोसे लगावले आणि एकमेकांच्या अंगावर मृत डुकराचे अवयव भिरकावले.

अमेरिकेतून पोर्क आयात करण्याच्या धोरणाला पंतप्रधान सू त्सेंग चांग हे आज मंजूरी देणे अपेक्षित होते. मात्र नॅशनॅलिस्ट पार्टीच्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पंतप्रधानांना बोलण्यापासून रोखले. त्यांनी सत्तारुढ पक्षाचे सदस्य बसलेल्या ठिकाणी मृत डुकराचे अवयव असलेल्या पिशव्या भिरकावायला सुरुवात केली.

त्यांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याला सत्तारुढ डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या सदस्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे संसदेतील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतच गेला आणि परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की काही वेळातच सर्वच लोकप्रतिनिधी एकमेकांना ठोसे लगावायला लागले. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्हच्या खासदारांनी नॅशनॅलिस्टच्या खासदारांनी संसद सभागृहाच्या मोकळ्या जागेत खाली पाडून चक्क तुडवायला सुरुवात केली.

तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांच्या प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील पोर्क आयातीवरील फार पूर्वीची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारी कराराबाबत चर्चा वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. तैवानमध्ये अमेरिकेतून पोर्क आणि बीफ आयात करण्यावरील बंदी जानेवारीपासून उठवली जाणार आहे.

स्थानिक शेतकऱ्यांकडून पोर्कना खायला घालायच्या औषधाची उपलब्धता कमी असल्याने अमेरिकेतून पोर्क आयातीच निर्णय घेण्यात आला. रविवारी या निर्णयाच्या निषेधार्थ हजारो लोकांनी तैपेईच्या रस्त्यांवर आंदोलन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.