तैपेई – जगातील अनेक मोठया देशांना करोना महामारीने हैराण केले आहे. मात्र, तैवानने या संकटावर यशस्वीपणे मत करत करोनावर विजय मिळवला आहे. तैवानमध्ये 200 दिवसांत एकही करोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही. तैवानमध्ये 12 एप्रिलला करोनाचा शेवटचा रुग्ण आढळला होता. यानंतर देशात एकाही करोना रुग्णाची नोंद झालेला नाही.
तैवानची एकूण लोकसंख्या सुमारे सव्वा दोन कोटी इतकी आहे. आतापर्यंत देशात करोनाचे एकूण 553 रुग्ण आढळून आले. तर सात जणांचा मृत्यू झाला. आसपासच्या देशांमध्ये रुग्ण आढळून येताच तैवानने तातडीने प्रवासावर निर्बंध लादले. यासोबतच देशात मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले.
करोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या. करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरित शोधून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. या सर्व प्रयत्नांना यश आल्याचे आता दिसून येत आहे.
करोनाला रोखणाऱ्या तैवानची जगभरातून दखल घेतली गेली आहे. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी तैवानचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील खासदार बर्नी सॅंडर्स यांनी ट्विट करून तैवानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. “त्यांनी हे कसं काय केले? त्यांनी विज्ञानावर विश्वास ठेवला, असे सॅंडर्स यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.