रजनीकांत यांचे चाहत्यांना कळकळीचे आवाहन; म्हणाले, कृपया…

चेन्नई – ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या प्रकृतीचं कारण देत येत्या काळात सक्रिय राजकारणाच्या वर्तुळात न उतरण्याची बाब जाहीर केली होती. पण, तरीही त्यांनी सक्रीय राजकारणात यावं, असाच आग्रह त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून धरण्यात आला.

किंबहुना काही चाहते आणि समर्थकांनी तर, यासाठी चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे हीच मागणी उचलून धरत एक आंदोलनही केलं. ज्यानंतर अखेर संपूर्ण परिस्थिती पाहून खुद्द रजनीकांत यांनीच काहीशी नाराजी व्यक्त करत चाहत्यांना एक आवाहन केलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून एका पत्रकाद्वारे त्यांनी ही बाब सर्वांच्याच निदर्शनास आणून देत वस्तुस्थिती सर्वांपुढं ठेवली. शिवाय आपण राजकारणात नेमके का येत नाही, याची कारणं अधिकच सुस्पष्ट स्वरुपात मांडली.

‘माझ्या नेतेपदासाठी आंदोलनात सहभागी न झालेल्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी यापूर्वीच राजकारणात प्रवेश का करत नाही याबाबतची कारणं स्पष्ट केली आहे. मी माझा निर्णयही सांगितला आहे.

मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंतीच करतो की, माझ्या राजकीय प्रवेशाची मागणी करण्यासाठी अशा प्रकारची आयोजनं करु नका आणि मला आणखी वेदना देऊ नका’, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.