मुंबई – अमेरिका युरोपातील करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील राजकीय परिस्थिती अस्थीर झाली आहे. या कारणामुळे देश-विदेशातील गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करीत आहेत.
परिणामी गुरुवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात कमी झाले.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 80 अंकांनी कमी होऊन 48,093 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टि 0.06 टक्क्यांनी म्हणजे आठ अंकानी कमी होऊन 14,137 अंकांवर बंद झाला.
या परिस्थितीबाबत बोलताना केपी सिक्युरिटी विश्लेषक एस रंगनाथन यांनी सांगितले की सकाळी अमेरिकेतील परिस्थिती अनिश्चित होती मात्र नंतर अमेरिकेच्या संसदेने बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे निर्देशांकांचे जास्त नुकसान झाले नाही.
मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मानसिकतेत आहेत. जागतिक शेअर बाजारातील वातावरण गुरुवारी संमिश्र होते. नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बॅंक, टायटन या कंपन्यांचे शेअर दोन टक्क्यांपर्यंत घसरले. मात्र भारती एअरटेल, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, बजाज फिन्सर्व्ह, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.