Stock Market Today – निर्देशांक विक्रमी पातळीवर असल्यामुळे सावध गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसापासून विक्री होत असतानाच जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पावणे दोन टक्क्यानी उसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 834 अंकांनी म्हणजे 1.72 टक्क्यांनी उसळून 49,398 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 239 अंकांनी वाढून 14,521 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसीबरोबरच एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज या बड्या कंपन्यासह बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, एल अँड टी, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. मात्र या तेजीच्या वातावरणातही आयटीसी, टेक महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी झाली याची कारणमीमांसा करताना विश्लेषकांनी सांगितले कि, कालपर्यंत अमेरिकेतील सत्तांतर निर्विघ्नपणे पार पडेल की नाही याबाबत जागतिक गुंतवणूकदारांना शंका होती. मात्र बुधवारी जो बायडेन यांचा शपथविधी निर्विघ्नपणे पार पडेल याची खात्री गुंतवणूकदारांना झाली आहे.
त्याचबरोबर अमेरिकेच्या नियुक्त अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी आगामी काळात विकास दर वाढविण्यास प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे सिनेटला सांगितल्यामुळे अमेरिका भांडवल सुलभतेत हात आखडता घेणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटते.
प्रदीर्घ काळ येऊ शकणाऱ्या मंदीचा सामना करण्यासाठी अमेरिकन संसदेने आर्थिक प्रोत्साहनाबद्दल उधार भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत यांनी सिनेटच्या समितीसमोर व्यक्त केले. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यापासून गुंतवणूकदारांनी सकारात्मक संदेश घेऊन खरेदी केली. त्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. याचा भारतीय निर्देशांकांनाही आधार मिळाला.
मारुती सुझुकी कंपनीने आपल्या काही मॉडेलचे दर वाढविण्याचे जाहीर केल्यानंतर या कंपनीचा नफा वाढेल या दृष्टिकोनातून या कंपनीच्या शेअरची खरेदी झाली. त्याचबरोबर नफादायक ताळेबंद जाहीर केल्यामुळे माइंडट्री कंपनीच्या शेअरचे भाव सहा टक्क्यांपर्यंत वाढले होते.