नवी दिल्ली – किरकोळ किंमतीवर आधारीत महागाई कमी झाल्याची आकडेवारी सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केली. त्याचबरोबर जपानसह आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स प्रथमच 52,000 अंकांच्या पुढे बंद झाला.
बाजार बंद होताना सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत 1.18 टक्क्यांनी म्हणजे 609 अंकांनी उसळून 52,154 अंकांवर बंद झाला. एक वेळ सेन्सेक्स 52,235 अंकापर्यंत वाढला होता. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टि 151 अंकांनी वाढून 15,314 अंकांवर बंद झाला.
जपानची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्यामुळे जपानमधील शेअर बाजाराचे निर्देशांक व विक्रमी पातळीवर गेले. त्याचबरोबर महागाईचा दर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार सुखावले आहेत. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर कमी होऊन 4.59 टक्के इतका नोंदला गेला आहे.
इतर आशियाई शेअर बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. जागतिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे क्रुडचे द्वार मात्र वाढून 63.24 डॉलर प्रती पिंपवर गेले आहेत.
या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली –
ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स, स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी आणि कोटक बॅंक
या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली-
डॉ. रेड्डीज, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स