मुंबई – गेल्या आठवड्यात शेअर बाजार निर्देशांकांत बरीच घट झाली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी तिसऱ्या तिमाहीत विकास दर अधिक 0.4 टक्के झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात सकाळपासून बरीच खरेदी झाली.
बाजार बंद होताना सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 749 अंकानी म्हणजे 1.53 टक्क्यांनी वाढून 49,849 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 232 अंकांनी वाढून 14,761 अंकांवर बंद झाला.
आज खरेदीचा जोर इतका होता की सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी 29 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. ऑक्टोबर – डिसेंबर 2020 या तिमाहीत विकास दर 0.4 टक्के इतका नोंदला गेला आहे.
अगोदरच्या दोन तिमाहीत भारताचा विकास दर उणे पातळीवर होता. आता विकास दर वाढल्यामुळे बाजारामध्ये स्थिर वातावरण निर्माण झाले असून अस्थिरता निर्देशांक बराच कमी झाला आहे.
शुक्रवारी निर्देशांक पावणे चार टक्क्यांनी कोसळले होते. शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 8,295 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी बाजारांनी जाहीर केली आहे. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केले असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.