चंदिगढ -पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यात तीन माजी खेळाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातून निवडणूक रणांगणाचे रूपांतर राजकीय क्रीडांगणामध्ये झाल्याचे चित्र आहे.
आम आदमी पक्षाने (आप) घनौर मतदारसंघात गुरलाल सिंग यांना मैदानात उतरवले आहे. ते माजी कबड्डीपटू आहेत. पतियाळा ग्रामीण मतदारसंघातून माजी क्रिकेटपटू मोहित महिंद्रा नशीब आजमावत आहेत. त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. पतियाळा जिल्ह्यातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये सर्वांत दिग्गज आहेत ते माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग. ते एकेकाळी पोलो खेळाडू होते.
कॉंग्रेसमधून बाहेर पडून पंजाब लोक कॉंग्रेस या नव्या पक्षाची स्थापना करणारे अमरिंदर त्यांच्या बालेकिल्ल्यातून (पतियाळा शहर) निवडणूक लढवत आहेत. पंजाबमधील इतर मतदारसंघांतून अजूनही काही माजी खेळाडू निवडणूक लढवत आहेत. त्या राज्याच्या राजकीय मैदानात सातत्याने माजी खेळाडू खेळी करताना दिसतात. सध्या त्यातील एक ठळक नाव म्हणजे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे सिद्धू अमृतसरमधून निवडणूक लढवत आहेत. ते त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.