तोटा झाल्यास चालक-वाहक जबाबदार; एसटीचे नवे परिपत्रक

 तोट्याचे खापर वाहक-चालकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न

पिंपरी – मागच्या कित्येक वर्षांपासून तोट्यात चालत असलेल्या एस.टी महमंडळाने आता सतत होणारा तोटा कमी करण्यासाठी नामी शक्‍कल काढली आहे. एस.टी महामंडळाला होणाऱ्या तोट्याला चालक-वाहकांना जबाबदार धरुन कारवाई करण्याचे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. त्यामुळे, तोट्याचे खापर चालक-वाहकांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जात असल्याने चालक वाहकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. नव्या परिपत्रकाची अंमलबजावणी झाल्यास चालक-वाहक व प्रशासनात संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत.

मागील काही वर्षांपासून एसटीला सतत होत असलेल्या तोट्यावर नविनच तोडगा काढला आहे. एसटीच्या मार्गावर प्रवाशांना गाडीत घेण्याबाबत चालक-वाहक उदासीनता दाखवितात, असा ठपका ठेवून ज्या मार्गावर एसटी धावत असेल तो मार्ग तोट्यात आल्यास या तोट्याला संबंधित मार्गावरील वाहक आणि चालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. याशिवाय या परिपत्रकाद्वारे कर्मचाऱ्यांवर विविध जाचक अटीही लादण्यात आल्या आहेत. या परिपत्रकामुळे प्रशासनाने आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे खापर चालक वाहकांवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या परिपत्रका विरोधात आतापासून कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होण्यास सुरुवात झाली असून ज्या गोष्टींमुळे महामंडळ तोट्यात आहे ते सोडून नाही ते उद्योग काही ठराविक मंडळी स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी करत असल्याचा आरोप होवू लागला आहे.

महामंडळ तोट्यात येण्याची प्रमुख कारणे वेगळी आहेत. चुकीच्या मार्गावर वारंवार गाड्या पाठविणे, नादुरुस्त गाड्या मार्गावर सोडणे, किंमतीपेक्षा अधिक रक्कमेचे पार्ट खरेदी करणे, तसेच गाड्यांच्या खरेदीमधील भ्रष्टाचार, प्रशासकीय कामांसाठी अनावश्‍यक व भरमसाठ कर्मचारी या व इतर अनेक बाबी तोट्याला कारणीभूत असताना वाहक व चालकाला जबाबदार धरणे हा प्रकारच चुकीचा असल्याचे मत अनेकांनी आज व्यक्त केले. एसटीच्या सेवत 30 टक्के गाड्या जीर्ण झाल्या आहेत. त्या वारंवार दुरुस्त करुन वापरतात, अशा मोडक्‍या गाडीतून प्रवास करण्यापेक्षा खाजगी गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. शिवशाहीमुळे लांब पल्ल्याचे प्रवाशी महामंडळाच्या गाड्यातून प्रवास करतात मात्र ग्रामीण आणि बाजारी, यात्रा- जत्रांसाठी चालणाऱ्या गाड्यांची अवस्था बिकट आहे. या गाड्यांमध्ये बदल केल्यास उत्पन्न वाढू शकते. उत्पन्ना वाढीवर भर देण्याऐवजी प्रशासनाने सुरू केलेला प्रकार हा दुर्देव असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

“वाहक-चालक प्रामाणिकपणे सेवा देत असतात. एखाद्या प्रवाशाला पैसे देऊन तिकिट नाही देले तर होणारी कारवाई मान्य आहे. मात्र, एस.टीला होणाऱ्या तोट्याला वाहक व चालकाला जबाबदार धरणे चुकिचे आहे.
– कुलदिप सावंत, एस.टी कर्मचारी

चालविता येत नसल्यास आमच्याकडे द्या

महामंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्ट आणि बेजाबदार व्यक्तींचा भरणा वाढला आहे. या लोकांच्या चुकीच्या धोरणामुळेच महामंडळ तोट्यात आहे. जर वाहक चालकांनाच जबाबदार धरायचे असेल तर संपूर्ण प्रशासकीय कारभार वाहक चालकांच्या ताब्यात द्या, महामंडळ वर्षभरात फायद्यात येईल, असे मत वल्लभनगर आगारातील काही चालक व वाहकांनी व्यक्त केले. आपल्या चुकांचे आणि भ्रष्टाचाराचे खापर आमच्या माथी मारण्याचा प्रकार झाल्यास आम्ही खपवून घेणार नसल्याचा गर्भीत इशाराही काहीजणांनी यावेळी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.