खुली स्क्वॅश अजिंक्‍यपद स्पर्धा : विजय मीना आणि तन्वी खन्ना यांना विजेतेपद

पुणे – आयस्क्वॅश अकादमी तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बेकवेसृजन आयस्क्वॅश कुमार व वरिष्ठ पुणे खुली स्क्वॅश 2019 अजिंक्‍यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पुरुष गटात नायबसुभेदार विजय मीना याला, तर महिला गटात दिल्लीच्या तन्वी खन्ना या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. तर, आकांक्षा गुप्ता, अनाहत सिंग, काव्या बन्सल, अनन्या मोरे, अगस्त्य बन्सल, अर्णव सरीन, विवान शहा, राहुल भाटिया, संजय पवार या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

मुंढवा येथील चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्‍लबच्या स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला गटात तिसऱ्या मानांकित दिल्लीच्या तन्वी खन्ना हिने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित उर्वशी जोशीचा 11-8,11-5,11-2 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 22वर्षीय तन्वी हि दिल्लीमध्ये सिरिफोर्ट कॉम्प्लेक्‍स येथे प्रशिक्षक ध्रुव धवन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या वर्षातील तिचे या गटातील दुसरे विजेतेपद असून याआधी मुंबई येथे जुहू जिमखाना येथील स्पर्धेत महिला गटात विजेतेपद पटकावले होते.

11 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या आकांक्षा गुप्ताने राजस्थानच्या दुसऱ्या मानांकित छवी सरनचा 11-2,11-5,11-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात दिल्लीच्या बिगरमानांकित अनाहत सिंग उत्तरप्रदेशच्या अव्वल मानांकित खुशबुचा 11-7,11-5,11-5 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

अनाहत ही द ब्रिटिश स्कुलमध्ये सहावी इयत्तेत शिकत असून सिरिफोर्ट व साकेत येथे प्रशिक्षक अमजद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तिचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. 15 वर्षाखालील गटात अव्वल मानांकित काव्या बन्सल हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित साईशा गुप्ताचा 11-6,11-5,11-7 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.