पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शासनमान्य पदावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरूवारी सेवेत कायम केल्याचे आदेशाचे वितरण करण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून कायम सेवेसाठी प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या निमित्ताने विद्यापीठात रक्तदान शिबिर आयोजिण्यात आले होते.
विद्यापीठात 2014 मध्ये 210 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र शैक्षणिक अर्हता उंचावणे, पदनाम या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया लांबली होती. 210 पैकी 98 कर्मचारी कायम सेवेसाठी प्रतिक्षेत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडली होती. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यापीठातील राष्ट्रवादी कर्मचारी संघाने आंदोलन पुकारले होते. त्यावेळी कुलगुरूंनी उवरित सर्व कर्मचाऱ्यांना कायम आणि पदोन्नी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी होत असल्याने त्यानिमित्ताने आज विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात संघटनेने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. त्यात प्राधिनिधिक स्वरुपात कर्मचाऱ्यांना कायम केल्याचे आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. विजय खरेसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
85 कर्मचाऱ्यांचे रक्तदान
कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी मुख्य इमारतील रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 85 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले होते.