मुंबई – भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने तिच्या विवाहाबद्दल विचारणा करणाऱ्या एका युजरच्या गुगलीवर चांगलाच टोला लगावला व त्याची बोलतीच बंद केली. सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांसह खेळाडू देखील घरातच आहेत. त्यामुळे कधीनव्हे ते सोशल मीडियावर सक्रिय सहभाग घेताना दिसत आहे. त्यातच नेटकऱ्यांना या खेळाडूंशी संवाद साधण्याची तसेच त्यांना प्रश्न विचारण्याचीही संधी मिळत आहे. अशाच एका युजरने स्मृतीला विवाहाबद्दल विचारले.
तुझ्या जोडीदाराबद्दल तुझे काय मत आहे. त्याच्याकडून तुझ्या अपेक्षा काय आणि अरेंज मॅरेज करणार का लव्ह मॅरेज, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मला लव्ह कम अरेंज मॅरेज करायला आवडेल असे मानधनाने सांगितले. याच संवादात तू कोणाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना, असे विचारल्यावर ते तर मलाही माहीत नाही, असे सांगुन स्मृतीने या युजरचीच विकेट घेतली.
तू दिसायला छान आहेस, चित्रपटात काम का करत नाहीस, या प्रश्नावर तिनेही एक हास्य इमोजी पोस्ट केली व माझे चित्रपट पाहण्यासाठी कोणीही येणार नाही, असे सांगत युजरची बोलतीच बंद केली.
तुझ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, असेही तिला विचारले गेले. यावर माझी पहिली अपेक्षा ही आहे की, त्याने माझ्यावर प्रेम करावे व दुसरी अपेक्षा ही आहे की त्याने पहिली अपेक्षा पूर्ण करावी, असा गुगलीही टाकला.