कोलंबो, दि. 24 – श्रीलंकेमध्ये सध्या करोना विषाणूचा नवीन व्हेरियंट सापडला असून आतापर्यंत सापडलेल्या करोना विषाणूच्या व्हेरियंटपेक्षा तो अधिक घातक असल्याचे श्रीलंकेतील तज्ञांनी म्हटले आहे. आतापर्यंतच्या व्हेरियंटपेक्षा हा नवीन व्हेरियंट अधिक घातक आहे आणि त्याचा संसर्गही अधिक वेगाने होतो आहे.
या विषाणूची बाधा असलेले दूषित कण हवेमध्ये तासभर तरंगत राहू शकतात, असे श्री जयवर्देनापुरा विद्यापीठातील इम्युनोलॉजी ऍन्ड मोलेक्युलर सायन्स विभागाचे प्रमुख निलीका मालविगे यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेत गेल्या आठवड्यात नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा झाला होता. त्याच दरम्यान या नवीन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असावा आणि विशेष करून युवा वर्गाला हा संसर्ग झाला असल्याची भीती व्यक्त होते आहे. श्रीलंकेतील करोनाच्या साथीची आता तिसरी लाट सुरू होण्याची लक्षणे दिसत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य निरीक्षक उपुल रोहाना यांनी म्हटले आहे.
या विषाणूचा संसर्ग प्रत्यक्षात किती जणांना झाला, हे आगामी 2-3 आठवड्यांनी निष्पन्न होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान श्रीलंकेतील कोविड विरोधी मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. या सूचना 31 मे पर्यंत लागू राहणार आहेत. पूर्वी लागू केलेले नियमच आता अधिक कठोर करण्यात आले आहेत. श्रीलंकेमध्ये दोन आठवड्यांपूर्वी दिवसाला 150 रुग्ण सापडत होते. ते प्रमाण आता दिवसाला 600 रुग्णांवर पोहोचले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ लागला आहे. श्रीलंकेव्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि आशिया खंडातील अन्य देशांमध्येही करोना विषाणूचे नवीन व्हेरियंट सापडले आहेत.