महाराष्ट्राला कोविड स्थिती हाताळण्यात अपयश यावे यासाठी भाजपचे कसून प्रयत्न

शिवसेनेचा फडणवीस आणि दरेकरांवर आरोप

मुंबई  – करोनावरील रेमडेसिविर या औषधाची साठेबाजी करणाऱ्या एका औषध कंपनीच्या प्रमुखाकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली असताना त्यात बाधा आणणच्या देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नांवर शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून जोरदार प्रहार केला आहे. हा राज्याची आरोग्य आणि कायदा व्यवस्था धोक्‍यात आणण्याचा कट होता काय, असा संशयही त्यांनी व्यक्‍त केला आहे.

त्यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राला कोविड स्थिती हाताळण्यात अपयश यावे, यासाठी भाजपने कसून प्रयत्न चालवले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांचे जीव वाचण्याच्या कामात तरी महाराष्ट्र सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत असणे गरजेचे होते. औषधांच्या अभावी लोकांच्या ज्या चिता जळत आहेत, त्या जळणाऱ्या चितांवर तरी कोणी राजकारण करण्याची गरज नाही.

या औषधांच्या निर्यातीवर बंदी असताना त्याची साठेबाजी करून तो साठा विदेशात नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या बाबतीत भाजप नेत्यांवर केला जात आहे. राज्यात ऑक्‍सिजन आणि रेमडेसिविरचा मोठा तुटवडा असताना भाजपचे नेते मात्र विनापरवाना हा औषध साठा एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने खरेदी करण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोपही यात करण्यात आला आहे.

राज्याच्या बाजूने विरोधी पक्षनेत्यांनी उभे राहण्याऐवजी ते (फडणवीस) औषध कंपनीच्या बाजूने वकिली करीत होते, असा प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीच पाहायला मिळाला नव्हता, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.