मुंबई – ईडीचे अधिकरी संजय राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. त्यांची पुढील चौकशी ही ईडी कार्यालयात होणार आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी अधिकारी आज चौकशीसाठी संजय राऊत यांच्या घरी दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटमध्ये पोहोचले होते. सकळी सव्वा सात वाजतापासून अधिकारी राऊत यांची चौकशी करत होते. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतले असून त्यांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांच्या चौकशीसाठी ईडी अधिकारी त्यांच्या घरी पोहोचल्याचे समजताच मुंबई परिसरातील शिवसैनिक राऊत यांच्या घराबाहेर एकत्र आले होते. यावेळी त्यांनी राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी राऊत यांच्या कारवाईविरोधात निदर्शने होते आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते म्हणत आहेत की, ही सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. इंग्रजांप्रमाणे हे सरकार वागणूक देत असल्याचे म्हंटले आहेत. तर भाजप नेत्यांनी म्हंटले की, कर नाही त्याला डर कशाला.. चौकशी होऊ द्या, काय सत्य असेल ते बाहेर येईल. दरम्यान, आता संजय राऊत यांना अटक होणार की चौकशी करून सोडून देणार हे पाहणे आता महत्वाचे आहे.