करोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात होणार महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी

पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या बैठकीत निर्णय

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. पक्षकारांनी गरज असेल, तरच न्यायालयात यावे. अन्यथा येऊ नये, असा निर्णय पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांच्या बैठकीत सोमवारी झाला. येरवडा कारागृहातील बंदीना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याबाबतचाही निर्णय यावेळी झाला आहे.

राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण पुण्यात आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी घेण्याचे पत्र पुणे बार असोसिएशनने प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी. धोटे यांना दिले होते. या पार्श्‍वभूमीवर बारचे पदाधिकारी आणि धोटे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये पक्षकार हजर राहिले नाहीत, तर त्यांचा विरोधात सुनावणी करण्यात येणार नसल्याचा निर्णय झाला आहे. याबाबत धोटे अंतर्गत आदेश काढणार आहेत.

याविषयी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक म्हणाले, महत्त्वाच्या जामीन, मनाई, स्थगिती आदेश, संपत आलेली प्रकरणे, बाहेरगावहून पक्षकार आलेल्या प्रकरणात सुनावणी घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. इतर प्रकरणांना पुढील तारखा देण्यात येणार आहेत. नागरिकांनी सुनावणीबाबत कोणतीही भीती बाळगू नये. त्यांच्या अपरोक्ष सुनावणी होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने येरवडा कारागृहातील बंद्याना प्रत्यक्ष हजर करू नये. तर, व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.