लवकरच सगळा देश ढवळून निघेल – शत्रुघ्न सिन्हा यांचा दावा

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक झाली. तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक नसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, कॉंग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे. तिसऱ्या आघाडीचा हा आरंभ सुरू झाला आहे. यात अजून लोक जोडले जातील. ही मोहीम संपूर्ण देश ढवळून काढेल, असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.

यशवंत सिन्हा हे स्टेट्‌समन आहेत. त्यांच्या आणि देशातील सर्वात मोठे राजकीय चाणक्‍य शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्वजण एकत्र येत आहेत. सर्वांची एकजूट होणं ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. आता सुरुवात झाली आहे. यापुढे आणखी लोक यात समील होतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे. त्याही आमच्यासोबत आहेत. जर नसतील तर येतील, असा दावाही त्यांनी केला.

देशात कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मीही या बैठकीला जाणार होतो. पण काही कारणास्तव पोहोचू शकलो नाही. मात्र, या घडामोडीतून चांगलं निष्पन्न होईल. दक्षिण भारतातील बहुतेक पक्षही जोडले जातील. भाजपने धन शक्ती आणि भय शक्तीचा प्रयोग केला. मात्र, आता काही लोकांचे डोळे उघडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत लोकांना फोडलं जातं. हे योग्य नाही, असे ते म्हणाले.

तुम्ही तुमच्या वैचारिक आस्थेने एखाद्या पक्षात आला तर ठिक आहे. सध्या सर्वात प्रतिभावान लोक कॉंग्रेसमध्ये आहेत. यातील काही लोकांची नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यावर तोडगा निघेल. आता मुद्द्यापासून दूर होऊन चालणार नाही. कॉंग्रेसमधील नेतृत्वाच्या संकटावर मात केली जाईल, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.