आशादायक वातावरणामुळे सेन्सेक्‍स पोहोचला विक्रमी पातळीवर

40 वर्षांपासून सेन्सेक्‍सने दिला 17 टक्‍के परतावा

मुंबई – देशातील आणि परदेशातील भांडवल सुलभतेच्या शक्‍यतेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक चालूच आहे. त्यामुळे मंगळवारी सलग चौथ्या दिवशी निर्देशांक वाढून विक्रमी पातळीवर बंद झाले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स मंगळवारी 184 अंकांनी वाढून 39,056 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी वाढून 11,700च्या वर म्हणजे 11,713 अंकांवर बंद झाला.

मंगळवारी दूरसंचार, वाहन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या तेजीत होत्या. तर तेल आणि नैसर्गिक वायू एफएमसीजी आणि धातू क्षेत्राला नफेखोरीचा फटका बसला. टाटा मोटर्स, एअरटेल, बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड, इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंकेचे शेअर पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

दरम्यान सोमवारी झालेल्या व्यवहाराच्या माहितीनुसार सोमवारी परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारावर विश्वास दाखवत 43 कोटी रुपयांच्या शेअरचे खरेदी केली. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक मंगळवारी सुरू झाली आहे.

गुरुवारी पतधोरण समितीचे निष्कर्ष रिझर्व बॅंकेच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहेत. देशातील एकूण परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅंक रेपोदरात पाव टक्‍क्‍यांनी कपात करेल असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटते. किंबहुना याच कारणामुळे गेल्या एक महिन्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत.

चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धात कमी झालेला तणाव आणि इतर कारणांमुळे जागतिक शेअरबाजाराचा निर्देशांकही सध्या वाढत आहेत. त्याचबरोबर भारतीय उद्योगातून आगामी काळात चांगला परतावा मिळण्याच्या शक्‍यतेमुळे परदेशी गुंतवणूकदारही भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक करीत आहेत, असे विश्‍लेषकांना वाटते.

दरम्यान, सेन्सेक्‍स 39 हजारांवर बंद झाल्यानंतर समाधान व्यक्त करून मुंबई शेअरबाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चव्हाण म्हणाले की, सेन्सेक्‍स चाळीस वर्षापूर्वी सुरू करण्यात आला होता. आताही हा निर्देशांक गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी विश्वासार्ह समजला जातो. देशातील उद्योग आणि गुंतवणूकदार या निर्देशांकाबाबत विचार करतात . त्याचबरोबर गेल्या चाळीस वर्षापासून मुंबई शेअर बाजाराच्या या मुख्य निर्देशांकाने वर्षाला 17 टक्‍के परतावा दिल्याची नोंद केली आहे. आगामी काळाबाबतही आम्ही आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले.

आता निर्देशांकांना धोक्‍याची चाहूल
विक्रमी पातळीवर असलेल्या शेअरबाजार निर्देशांकांना आता धोक्‍याची चाहूल लागली असल्याचा दावा काही विश्‍लेषकांनी केला. सध्या राष्ट्रीय शेअरबाजारावरील 31 कंपन्यांचे भाव 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून निफ्टी पाहिजे त्या वेगाने वाढत नसल्याचे काही विश्‍लेषकांना वाटते. काही विश्‍लेषकांनी सांगितले की, निफ्टी सकाळी वाढत आहे मात्र त्या पातळीवर कायम राहण्यास अडचणी येत आहेत. जर परिस्थितिजन्य कारणामुळे विक्री वाढली तर निफ्टी कमी होऊन 11,640 या पातळीवर जाऊ शकतो. त्यानंतरही विक्री चालूच राहिली तर 11,580 या पातळीवर जाऊ शकतो असे काहींना वाटते. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.