व्याजदर कपातीनंतरही निर्देशांकांत घट

कमी पर्जन्यमान, घटणाऱ्या विकासदराचा परिणाम

मुंबई -रिझर्व्ह बॅंकेने सलग दुसऱ्या पतधोरणात रेपो दरात पाव टक्‍क्‍यांनी कपात केली आहे. मात्र तरीही शेअरबाजार निर्देशांकांत गुरुवारी घट झाली. पाऊस कमी पडण्याची शक्‍यता असल्यामुळे बुधवारी शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली होती. आज जरी रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली असली तरी रिझर्व्ह बॅंकेने या वर्षाचा विकासदर 7.2 टक्‍के या मर्यादेत राहणार असल्याचे म्हटले आहे. त्याचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला असल्याचे समजले जाते.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 192 अंकांनी म्हणजे 0.49 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 38,684 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी गुरुवारी 45 अंकानी कमी होऊन 11,598 अंकावर बंद झाला.

आज झालेल्या विक्रीचा नकारात्मक परिणाम माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रावर होऊन या क्षेत्रांचे निर्देशांक 1.53 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले. बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक गुरुवारी 0.67 टक्‍क्‍यांनी कमी झाला मुख्य निर्देशांकांबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.32 टक्के कमी झाल्याचे दिसून आले. या परिस्थितीचे विश्‍लेषण करताना वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंक व्याजदर कपात करणार असल्याचे बहुतांश गुंतवणूकदारांनी अगोदरच गृहीत धरल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून शेअरबाजार निर्देशांक वाढून उच्च पातळीवर गेले होते.

आता यात वाढ होण्यास कमी वाव आहे. त्यातच लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या वर्षी पाऊस कमी पडणार असल्याचे संकेत आहेत. या कारणामुळे रिझर्व्ह बॅंकेनेच विकासदर 7.2 टक्‍के एवढाच राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काही किरकोळ गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत आहेत याचा परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर झाला.

रिझर्व्ह बॅंकेने केवळ व्याजदरात कपात केलेली नाही तर आगामी काळातही कपात करण्याची शक्‍यता खुली ठेवली असूनही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. त्यातच आतापर्यंत भारतीय शेअरबाजारात एकतर्फी गुंतवणूक करीत असलेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 140 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनीही बुधवारी 80 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.