एकीकडे अमरोहा जिल्हा कोर्टाच्या शबनम-सलीम फाशी प्रकरणात डेथ वॉरंटची काउंटडाउन सुरू झाली आहे, तर दुसरीकडे मथुरा कारागृहातील महिला फाशीवरही तयारी सुरू झाली आहे. शबनमला येथे फाशी दिली जाऊ शकते. यासंदर्भात अद्याप कारागृह प्रशासनाला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी बक्सर कारागृहातून दोरीचा अंदाज मागविला गेला आहे.
मथुरा जिल्हा कारागृह (जेल) सुमारे दीडशे वर्ष जुने आहे. हे 1870 साली बांधले गेले होते. उत्तर प्रदेशमधील एकमेव महिला फाशीघर मथुरा कारागृहात आहे. तुरूंगात मॅन्युअलमध्ये तसा उल्लेख आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे फाशीघर अद्याप पूर्णपणे बांधलेले नाही. फाशीच्या नावावर फक्त एक छोटेसे बांधकाम आहे. जिथे अद्याप कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. या महिला फाशीघरात अनेक कमतरता आहेत. त्यात लटकण्यासाठी लीव्हर (जे ओढल्यानंतर गुन्हेगार फासावर लटकतो) आणि बोर्डदेखील नाहीये. इथल्या पायर्यासुद्धा दुरुस्त कराव्या लागतील. महिलांचे फाशीघर सध्या अपूर्णवस्थेत आहे. शबनम फाशी प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. येथील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथे सर्वसाधारण स्वच्छता सुरू आहे.
काय आहे शबनमचे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावातील शबनम हिने 15 एप्रिल 2008 रोजी प्रियकर सलीमसोबत कट रचून प्रेमात अडसर ठरत असलेल्या स्वतःच्याच कुटुंबातील सात जणांची निघृणपणे हत्या केली होती. शबनम आणि सलीम यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रपतींनीदेखील शबनम हिचा दयेचा अर्ज फेटाळलेला आहे. शबनम-सलीम प्रकरणात जिल्हा न्यायाधीश अमरोहा यांनी या खटल्याच्या अंतिम अहवालासाठी 23 फेब्रुवारीची मुदत दिली आहे.
या दिवशी डीजीसी आपला अहवाल जिल्हा न्यायाधीशांकडे सादर करेल. शबनम आणि सलीम प्रकरणात फाशी देण्याच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात कोणतेही अपील प्रलंबित आहे की नाही हे ते सांगतील. त्यानंतरच जिल्हा न्यायाधीश मृत्यूदंड जारी करण्याबाबत निर्णय घेतील.
त्यामुळे असे म्हटले जात आहे की शिक्षा कायम ठेवली गेली तर स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी शबनम ही पहिली महिला असेल.
फाशी ‘होणे’ आणि ‘देणे’ यात फरक!
कायदेतज्ञांच्या म्हणण्यानुसार फाशीची शिक्षा होणे आणि फाशी देणे यामध्ये फरक आहे. फाशीची शिक्षा होणे म्हणजे तशी शिक्षा सुनावली जाणे किंवा तसा आदेश देणे. फाशी देणे म्हणजे त्या आदेशावर अंमलबजावणी करणे. शबनम ही ‘फाशीची शिक्षा होणारी’ पहिली महिला ठरू शकते. म्हणजेच शबनम फाशीची शिक्षा मिळणारी/सुनावली जाणारी पहिली महिला ठरेल, असा याचा अर्थ होतो.
स्वतंत्र भारतामध्ये (1947 नंतर) आतापर्यंत कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतात फाशीची शिक्षा सुनावल्या गेलेल्या महिलांची माहिती घेऊ.
सीमा गावित आणि रेणुका शिंदे
लहान मुलांचे अपहरण करून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित या दोघी बहिणी होत्या. त्यांनी आई अंजनाबाई गावित व रेणुकाचा पती किरण शिंदे यांच्या मदतीने 1990 ते 1996 दरम्यान भीकेसाठी 13 लहान मुलांचे अपहरण केले होते. अपहृत मुलांपैकी नऊ जणांचा त्यांनी खून केला होता. मात्र, सरकारला यातील पाच खून सिद्ध करता आले. अंजनाबाईचा मृत्यू 1997 मध्ये झाला.
कोल्हापूरमधील न्यायालयाने 28 जून 2001 रोजी या दोन्ही बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने 8 सप्टेंबर 2004 रोजी हा निर्णय कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयानेही 31 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज 2014 साली राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे गावित भगिनी या स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर सोनिया नामक महिलेची 2007 साली सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम केली. फाशीची शिक्षा मिळालेली शबनम ही तिसरी महिला ठरेल.