लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार राधामोहनदास आगरवाल यांनी सीरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या करोनालसीच्या दरांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर, सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला हे डाकूपेक्षाही वाईट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सीरमने बुधवारी कोविशिल्ड लसीचे खुल्या बाजारातील दर जाहीर केले. त्यानुसार, राज्य सरकारांना लसीचा एक डोस 400 रूपये किमतीने उपलब्ध होईल. तर, खासगी रूग्णालयांसाठी तो दर 600 रूपये इतका असेल. त्या दरांवरून आगरवाल यांनी सीरम आणि पूनावालांवर टीकास्त्र सोडले. साथीच्या आजारांशी संबंधित कायद्याचा वापर करून पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सीरम कंपनी ताब्यात घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी मानली जाते. आता भारताबरोबरच संपूर्ण जगाला करोना लसीचा पुरवठा करण्यासाठी सरसावल्याने त्या कंपनीबरोबरच पूनावाला कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनले आहेत. अशात भाजप आमदाराने त्यांच्यावर केलेली टीका अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. त्या टीकेवरून वादंगही होण्याची शक्यता आहे.