मी खूप छान आहे, काळजी करू नका-लारा

मुंबई – माझी प्रकृती खूप छान आहे. काळजी करू नका. लवकरच मला रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे असे वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ फलंदाज ब्रायन लारा यांनीच दृकश्राव्य माध्यमाद्वारे त्यांच्या क्रिकेट मंडळास कळविले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करणाऱ्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

ह्रदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना परळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते येथे विश्‍वचषक स्पर्धेच्या अधिकृत वाहिनीसाठी विशेष समालोचक म्हणून काम करीत आहेत.
लारा यांच्या तब्येतीबाबत रुग्णालयाने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नाही तरीही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, लारा यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले व लगेच त्यांच्यावर छोटीसी शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. रुग्णालयातील वरीष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित पाठपुरावा केला जात आहे.

रुग्णालयाच्या वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ.जिग्ना श्रोत्रीय यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक रुग्णाचा आदर करीत असतो. रुग्णालयाचे धोरण म्हणून रुग्णाची परवानगी घेतल्याखेरीज त्याच्या प्रकृतीचा तपशील प्रसिद्ध करीत नसतो. त्यामुळेच आम्ही तपशील देऊ शकत नाही.

लारा यांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली का असे विचारले असता त्यांनी टिपण्णी करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. समालोचक म्हणून काम करण्यासाठी ते येथे आले असले तरी पाच सहा दिवस त्यांनी चित्रीकरणात भाग घेतला नाही असेही लारा यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here