सेबीकडून कंपन्यांना दिलासा; ताळेबंद 30 जूनपर्यंत सादर करता येणार

मुंबई – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विविध कामासाठीची मुदत वाढविण्याची गरज असल्याचे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांनी सांगितले होते. शेअर बाजार नियंत्रक सेबीने या मागणीवर विचार करून विविध कामकाजाच्या कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करण्यासाठी 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ते 30 जून पर्यंत सादर करता येतील. नियमाप्रमाणे तिमाही संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत म्हणजे 15 मे पूर्वी कंपन्यांना ताळेबंद जाहीर करावे लागणार होते. आता त्यांना 30 जून पर्यंत ताळेबंद जाहीर करता येतील.

31 मार्च अखेर संपलेल्या वर्षाचा वार्षिक ताळेबंद जाहीर करण्याची मुदत 30 मे होती. आता ही मुदत 30 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. सबीने घेतलेल्या निर्णयाचे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांनी स्वागत केले आहे.

पहिल्या तिमाहीतील कामकाज व्यवस्थित झाले होते. मात्र नंतर देशांमध्ये बऱ्याच शहरांमध्ये निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे मर्यादीत कर्मचाऱ्यांच्या आधारावर कंपन्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे ही मुदत वाढविण्याची गरज होती असे कंपन्यांनी सांगितले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.