..त्या जीवाला जीव लावणारे हवेत

वाघोली –  वाघोली-केसनंद रोडवर असणाऱ्या मिकासा सोसायटीमध्ये राहत्या घरात इंस्टाग्राम रील स्टार तरुण समीर गायकवाड याने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी उघडकीस आली.

प्रेमप्रकरणातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. इंस्टाग्राम वरील व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेल्या त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. केसनंद येथील त्याच्या मुळगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

समीर गायकवाड हा म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या हटके स्टाईलमुळे अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला होता. इंस्टाग्राम रील वरील त्याचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असल्यामुळे तरुणांमध्ये लोकप्रिय होता.

समीर ने अनेक समाजप्रबोधन पर व्हिडीओमधून तरुणांमध्ये जनजागृती देखील केली होती. त्याच्या मृत्यूनंतर देखील आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढत असून नागरिक त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.

तरुण मुलांमधे नैराश्य आल्यावर मानसिक आधाराची गरज असल्याने असे प्रसंग निर्माण होणार नाहीत आणि समीर सारखे तरुण या दुर्घटनेतून सहजरीत्या वाचू शकतात असे जाणकारांचे मत आहे. याबाबत काही नागरिकांनी, युवकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

तरुणांमध्ये नैराश्य निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. कोणतेही नैराश्य आल्यावर मानसिक संतुलन ढासळू न देता आपले मित्र, मैत्रीण, आपले आई वडील यांच्याशी मुक्त संवाद साधणे आता गरजेचे झाले आहे.
– चिराग राजेंद्र सातव पाटील (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा)

युवक, युवती मधील मानसिक धैर्य वाढीस लागावे व त्या परिस्थतीशी सामना करण्याची ताकद वाढीस लागण्यासाठी ज्यांना  ते युवक, युवती मदत मागतील त्यांनी त्या बाबत शक्य तेवढी योग्य मदत  त्या युवकांनी व नागरिकांनी त्यांना करून सामाजिक जाणीव जागृत  ठेवावी.
– संदीप सातव (संघटन सरचिटणीस भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा)

मानसिक स्वास्थ उत्तम राहण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान धारणा, मनन- चिंतन करणे गरजचे आहे याशिवाय कामात बदल करून जगण्याचा आनंद घ्यावा. निसर्गाशी मैत्री वाढवावी. आई वडील आपले नातेवाईक यांच्यावरील प्रेम व्यक्त करत जा.
– अनिल सातव पाटील (संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक संघटना पुणे जिल्हा)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.