मुंबई, अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित राधे हा सिनेमा पायरसी साइट्सवर लीक झाला आहे. त्यामुळे अभिनेता सलमान खान संतापला असून, त्याने हा प्रकार करणाऱ्या कंटकांच्या विरोधात साबयर सेलकडून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हा सिनेमा झी 5, झी प्लेक्स, डीटीएच सर्व्हिसेसवर विकत पाहता येतो. पण तो काही जणांनी पायरसी साइटवर लीक केला आहे. अनेक ठिकाणी राधे हा सिनेमा ऑनलाइन पाहता येऊ लागला आहे. त्यामुळे सलमानने संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्याने सोशल मीडिया साइटवर या प्रकरणी एक निवेदन जारी केले असून, त्यात त्याने म्हटले आहे की चोरट्या प्लॅटफार्मवर हा सिनेमा पाहणे गंभीर गुन्हा आहे.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 15, 2021
आम्ही हा सिनेमा इंटरनेटवर केवळ 249 रुपयांना उपलब्ध करून दिला असून, लोकांनी पैसे भरून अधिकृत व्यासपीठांवरून हा सिनेमा पाहावा. जिथे बेकायदेशीरपणे हा सिनेमा उपलब्ध आहे त्यावर सायबर पोलीस कारवाई करीत आहेत, असेही सलमानने म्हटले आहे.
असंख्य लोकांच्या कष्टातून एखादा सिनेमा बनत असतो. पण तो अशा बनावटीमार्गाने लोकांपुढे प्रदर्शित केला जात असेल, तर त्यातून अनेकांचे नुकसान होत असते. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत प्लॅटफॉर्मवरच हा सिनेमा पाहावा, असे आवाहनही त्याने केले आहे.