नेमबाजांबाबत सहानुभूती मात्र बहिष्कार नको – साक्षी मलिक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

नोएडा – नेमबाजीसारख्या आकर्षक क्रीडा प्रकाराला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून वगळण्याचा निर्णय अयोग्यच आहे. मात्र, त्याचा निषेध म्हणून या स्पर्धेवरच बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे अयोग्य आहे असे ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती कुस्तीगीर साक्षी मलिकने सांगितले.

बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत नेमबाजी आयोजित करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्यामुळे संयोजकांनी या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय ऑलिंपिक महासंघाने (आयओए) या स्पर्धेवर भारताने बहिष्कार घालावा असे ठरविले असून त्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मागितली आहे. आयओएच्या या आवाहनाबाबत साक्षीने सांगितले की, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच मोठा सहभाग असतो.

भारताने या स्पर्धेचे यशस्वी आयोजनही केले आहे. संयोजकांवर दबाव आणण्यासाठी बहिष्काराची धमकी देणे हा एक रणनीतीचा भाग आहे. मात्र बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे हे क्रीडा क्षेत्रास हानीकारक आहे. त्यामुळे सर्वसामान्य खेळाडूंमध्ये चुकीचा संदेश दिला जाण्याची शक्‍यता आहे. या स्पर्धेत भारतीय नेमबाज प्रत्येक वेळी भरघोस पदके मिळवित असतात. नेमबाजीला वगळले तर भारताच्या अन्य खेळाडूंमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

आगामी ऑलिंपिकबाबत साक्षीने सांगितले की, जागतिक स्पर्धेत पदक मिळवित ऑलिंपिकची पात्रता पूर्ण करण्याचे माझे ध्येय आहे आणि मी त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. जर जागतिक स्पर्धेत मला जर पात्रता पूर्ण करता आली नाही तर अन्य पात्रता स्पर्धेत मी माझे नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करीन. सर्वच गटांमध्ये भरपूर नवनवीन खेळाडू चमक दाखवू लागले आहेत. त्यामुळेच आता स्पर्धा वाढली आहे. जागतिक स्पर्धेत थोडेसे वेगळे तंत्र वापरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या अधिक कणखर होण्यावर मी भर देत आहे. त्यासाठी परदेशी प्रशिक्षक अँड्रयु कूक यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे डावपेच शिकत आहे.

साक्षीने रिओ येथे 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत 58 किलो गटात ब्रॉंझपदक मिळविले होते. ती आता 62 किलो गटात खेळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.