सायना नेहवालचा पहिल्याच फेरीत पराभव

क्वालालंपूर -मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे पुनरागमन अपयशी ठरले. गेल्या महिन्यात झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर आजारपणामुळे सायना स्वीस आणि इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत खेळू शकली नव्हती.

जागतिक क्रमवारी 21व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉंगने सायनाला 20-22, 21-15, 21-10 असे पराभूत केले. 21 वर्षीय चोचूवॉंगविरुद्ध सायनाचे पारडे जड मानले जात होते. मात्र, जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्‍यपद
स्पर्धेत तीन वर्षांपूर्वी रौप्यपदक जिंकणाऱ्या चोचूवॉंगने पहिल्या गेममधील संघर्षांनंतर सायनावर कुरघोडी केली.
यावेळी पहिल्या गेममध्ये सायनाने चोचुवॉंगवर वर्चस्व गाजवताना तिला प्रतिकाराच्या संधी कमी दिल्या.

मात्र, चोचुवॉंगने सायनावर आक्रमण सुरूच ठेवल्याने सायना थोडीशी दबावात खेळताना दिसून आली. यावेळी पहिला सेट सायनाने 22-20 अशा फरकाने संघर्षपूर्णपणे जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, चोचूवॉंगने दुसऱ्या राऊंडमध्ये सायनावर दबाव वाढवत दुसरा राऊंड 21-15 अशा फरकाने जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. यानंतर सायनाने तिसऱ्या सेट मध्ये पुनरागमनाचा प्रयत्न केला मात्र चोचुवॉंगने या सेटवर संपुर्ण वर्चस्व गाजवत तिसरा सेट 21-10 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला.

तर, गेल्या आठवड्यात झालेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या एच. एस. प्रणॉयचे आव्हान देखील पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. थायलंडच्या सिट्टहीकोम थामासिनने संघर्षपूर्ण लढतीत प्रणॉयला 12-21, 21-16, 21-14 असे पराभुत केले. तर, पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांचाही सलामीच्याच लढतीत पराभव झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.